Thursday, October 20, 2016

दीड दिवस आणि पाऊण रात्र घालवूनही हातातलं काम संपलं नाही, शिवाय त्यात आणखी कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागले, सकाळी तर ते अजूनच वाढायचं चिन्ह दिसलं, स्ट्रेस आला तेव्हा सरळ उठले आणि लॅपटॉप घेऊन बाहेर पडले, अजून दोघी मैत्रीणी ज्या त्यांच्याही कामाच्या प्रेशरखाली वैतागल्या आहेत त्यांना जॉइन झाले. मग आम्ही तिघी मिळून जवळच्या मॉलमधे लंच केलं आणि मग एकत्र बसून आपापली कामं केली. सोबत गप्पा आणि चहा आणि गाणी. तिघींच्याही डोक्यावरचं कामाचं प्रेशर झटकन निघून गेलं.
फ़्रीलान्सिंग करताना कामाचं, स्वत:च्या वेळेचं कितीही प्रिय स्वातंत्र्य असलं तरी ऑफ़िसमधल्या कम्युनिटी शेअरिंगच्या फ़ायद्यांना पर्याय नाही हे लक्षात आलं.

Monday, October 17, 2016

मी एक स्वार्थी वाचक

वाचन आणि पुस्तके संदर्भातल्या एका ग्रूपवर  Why do you read? या प्रश्नाला वाचकांनी I can not leave without books पासून I' d go insane if i didn't पर्यंत उत्तरे दिलेली वाचली. आणि आपण वाचन या प्रक्रियेत माझ्यापुरते बरेच इव्हॉल्व झाल्याचं जाणवलं. कोणे एके काळी मी सुद्धा अशीच निरागस उत्तरे दिली असावीत. एकतर पुस्तक वाचनाशिवाय मी आरामात दिवसेंदिवस जगू शकते हे अनुभवाअंती लक्षात आलय. 
दुसरं त्यातून निर्भेळ आनंद, करमणूक मिळवण्याची माझी कपॅसिटीच काहीशी कमी झाल्याने जोवर वेगळं काहीतरी मिळत नाही तोवर मी हातातलं पुस्तक वाचतच नाही हे लक्षात आलय. त्यामुळे माझ्यापुरती वाचन ही एक अत्यंत स्वार्थी गोष्ट झालीय. आता हे ’वेगळं काहीतरी’ मिळण्याचा स्वार्थीपणा कोणता? तर ते म्हणजे जोवर ’मला आवडलं असतं अशा प्रकारचं लिहायला’ अशी प्रतिक्रिया माझ्या मनात सुरुवातीच्या काही पानांतच किंवा त्याही आधी ब्लर्ब वाचूनच  उमटत नाही किंवा ’माझ्या लिहिण्याच्या जतकुळीला मिळतं जुळतं’ असं वाटत नाही तोवर मी पुस्तकाची पानही उलटायच्या भानगडीत पडत नाही. थोडक्यात  माझ्या स्वत:च्या लेखनाला वाचनातून काहीतरी प्रेरणा मिळणं, ट्रीगर मिळणं, मला लिहावसं वाटायला लागणं मस्ट आहे. 

Tuesday, October 11, 2016

तीन महिन्यांच्या गॅपनंतर आज टाऊनला चक्कर झाली.
कमलनयन बजाज गॅलरी मधे शुभांगी चेतन या आर्टिस्टचे ’पोत’ (टेक्श्चर्स) नावाचे प्रदर्शन भरले आहे. पहिलेच आहे. ब्लॅक इन्क, थोडी ब्राऊन टीन्ट वापरुन झाडांच्या खोडाचा पोत तिने आपल्या सगळ्या पेंटींग्जमधे रंगवला होता. दिसायला चांगली होती, चित्रांना फ़्लो छान होता पण ’पोत’ मधे जे वैविध्य अपेक्षीत आहे ते नव्हते. वैयक्तिकरित्या मला झाडांच्या खोडांचे फ़ॅसिनेशन असले तरी खरखरीत, खडबडीत, मुलायम, रखरखीत, रेशमी, मऊ, दगडी अशा अनेक प्रकारचे "पोत" असू शकतात ते इथे नव्हते. अर्थात हा आर्टिस्टचा चॉईस झाला. पण मला खटकलेली गोष्ट म्हणजे एकाही इमेजला ’स्पर्श’ करुन पहावासा वाटण्याजोगे टेक्स्चर कॅनव्हासला आणण्यात आर्टिस्ट कमी पडली. वेगळे टेक्निक वापरुन हे करता आले असते. पेंटींग्जमधे रंगलेपनातूनही जो पोत दिसतो, ्जाणवतो तो इथे नव्हता. हे फ़्लॅट होतं.
ठाणे स्कूल ऑफ़ आर्टची विद्यार्थिनी
रचना संसदचे सर आपल्या फ़र्स्ट इयरच्या मुलामुलींना घेऊन आले होते, छान वाटलं तो घोळका पाहून. फ़क्त ते प्रत्येक चित्र मुलांना ’समजावून’ सांगत होते. त्या ऐवजी आधी त्यांना चित्र पाहू देऊन तुम्हाला काय ’समजले’ विचारले असते तरी चाललं असतं असं वाटलं.

एनजिएमए मधे अल्काझी फ़ाउंडेशनचं आर्काइव खुलं केलं गेलं आहे आणि ते महान अनमोल आहे. प्रत्येक नाट्यप्रेमीनीच नाही, तर चित्रकला, सिनेमा, राजकारण, प्रवास, संगीत, नृत्य यात रस असणा-या प्रत्येकाने ते पहावं. अल्काझी हा माणूस शब्दश: एक संस्था आहे.
ओम शिवपुरी तरुणपणी ऎक्चुअली हॅन्डसम दिसायचा. सुधा शिवपुरी देखणी दिसायची. रोहिणी ओक (हत्तंगडी) तशीच दिसायची, नासिर, अमरिश पुरीला तरुण पाहिलेलं आठवत असल्याने ते काही फ़ार वेगळे नाही वाटले.

इंडियन कॉस्च्यूम्सची पुस्तकं, अल्काझींच्या नाटकांच्या सेट्सच्या मिनिएचए प्रतिकृती, त्यांचे कॉस्च्यूम्स, मराठी नाटकांच्या ऐतिहासिक संदर्भांचं पुस्तक, अल्काझींच्या थिएटर वर्कशॉप्सचे व्हिडिओज आणि शेकडो, हजारो कृष्णधवल देखणी छायाचित्रे.

अल्काझी टाइम्स हा तर अफ़लातून प्रकार, आर्ट आणि थिएटर टाईम्स हे एक काल्पनिक वर्तमानपत्र अल्काझी चालवत होते. गेल्या शतकापासूनच्या नाट्य, चित्रकला क्षेत्रापासून राजकारणापर्यंत असंख्य बातम्यांचं कोलाज भिंतींवर लावलेलं आहे. त्यात धुरंधरांचं निधन पासून पाकिस्तानचा हल्ला, केनेडीची हत्या पासून गांधीचं उपोषण.. अनेक बातम्या खरोखरीच्या वाचायला मिळतात.
सुलतान अकबर म्हणजे अकबर पदमसींचे कोण?
अल्काझी किती छान चित्रकारही होते. अनमोल डॉक्यूमेन्टेशन आहे हे प्रदर्शन.

हे प्रदर्शन पुन्हा पाहून त्यावर सविस्तर लिहायला हवं आहे.

बाकी तीन महिन्यांनंतर गेले आज टाऊनला. तो एक अनुभवच वाटला वेगळा. मरिन ड्राइव, त्यावरचा मावळता सूर्य, नरिमन पॉइन्ट, वरळी, हाजी अलीची स्कायलाईन पाहून नजरेवर गेले कित्येक दिवस ठळकपणे उमटलेली आल्बनी, न्यूयॉर्कच्या देखण्या नजा-यांची इम्प्रेशन्स फ़िकट झाली. आपली मुंबईही किती देखणी आहे.. असं झालं.


जादू

ही रात्र, हे चांदणं पुन्हा नसेल, ही जादू नसेल..
झाडांवरुन निथळणा-या सावल्या
बहार निघून जात आहे
पुन्हा परतून येणारे नाहीयेत हे काफ़िले बहारके, एकदाच पुकारतील तुला ते जायच्या आधी आणि मग कायमचे दिसेनासे होतील..
ही जादू अनुभवण्याचा हा एकच क्षण.. तो चिरकाल नाहीच

देव आनंद गातो आहे आर्तपणे, कदाचित स्वत:करताच. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट जुवेल.


जे हवं ते मिळण्याचा आणि त्यातली जादू हरवून जाण्याचा क्षण हा अनेकदा एकच असतो..
ही नात्यातली मर्यादा.

तुम्हाला खूप लिहायचं असतं, वाचायचं असतं, इकडे तिकडे हिंडून काही काही बघायचं असतं पण एकच एक कोणततरी रटाळ पण अतिआवश्यक काम तुमचे पाय, हात, डोकं सगळं बांधून ठेवतं. ते पूर्णही होत नाही, अर्धवटही सोडता येत नाही. मग तुम्ही अतिआवश्यक काम तसंच ठेवून अत्यंत फ़ुटकळ टाईमपास स्क्रीनवर करत रहाता. अतिआवश्यक काम अशाने अजून अजून अजून लांबत चालले आहे हे लक्षात येतच एका क्षणी. त्यानंतर मग निव्वळ हताशा आणि कीबोर्डवर थडाथड राग काढत रहाणं.. इतकंच हातात रहातं.

पुन्हा आलमेलकर

आलमेलकरांचं काम मी आधी खूप पाहिलेलं नाही, एमजिएमएचं प्रदर्शन पहाताना पण समहाऊ हे आपण सारखं सारखं अनेकदा पाहिलय असं वाटत राहिलं. कदाचित त्यांचे गुरु बेन्द्रे, त्यांची चित्रं मला खूपच आवडतात. ती अनेकदा पाहिलेली आहेत. आणि आलमेलकरांच्या पठडीतले दलाल आणि इतर बरेच आहेत. शिवाय आलमेलकर ज्या आदिवासी चित्रांकरता सर्वात जास्त फ़ेमस आहेत ती किंवा तशी इतक्यांदा कॅलेंडर्सवर, दिवाळी अंकांवर, इलस्ट्रेशन्समधे, घरांच्या भिंतीवर सजावटीकरता लावलेल्या फ़्रेम्सवर पाहिली आहेत त्यामुळे हा देजावू.
रेषा डौलदार आहे, पण त्यात स्वैर रेषेतली मजा मिसिंग वाटते. रंग जरा जास्तच झळझळीत त्यामुळे कृत्रिमतेकडे, डेकोरिटवपणाकडे झुकणारे वाटले कॅनव्हास. आदिवासी स्त्रियांच्या कपड्या, दागिन्यांमधेही वास्तवता मिसिंग आहे. सगळ्या एकजात दागिन्यांनी नटलेल्या. बर तेही दगडांचे किंवा नैसर्गिक बिया, मण्यांचे दागिने नाहीत, चक्क पुतळ्यांच्या माळांसारखे हार गळ्यात. जरा जास्तच सधन आदिवासी वाटत होते. रोमॅन्टीक, काव्यमय आदिवासी जीवन. स्टायलेझशनचा प्रभाव. बेन्द्रेंवरही होताच तो प्रभाव.
देवदत्तची चित्रं मला खूप आवडतात, पण त्याच्या चित्रांवर असलेला युरोपियन प्रभाव- हे आपलं पॅलेट नाही. स्किन कलर वगैरे..हे युरोपियन पण तिथे शिकल्यामुळे त्याच्यावर तो प्रभाव उमटला. त्यातून तो बाहेर पडत नाहिये.

साच्यामधे का अडकतात आर्टिस्ट? उदा. शशिकांत धोत्रे.
खरं तर त्याची दगडफ़ोडणार्यांची पार्श्वभूमी. मग त्याला का वाटू नये त्यांचं जगणं कॅनव्हासवर उतरवावं असं?
जसं पोटॅटो इटर्सचं जगणं व्हॅन गॉघला उतरवणं महत्वाचं वाटलं तसं?
कोळशाच्या खाणीतलं वातावरण आपल्या इन्स्टॉलेशन्समधून मांडणं प्रभाकर पाचपुतेला महत्वाचं वाटलं तसं?

डिझाईनमधला, आर्टमधला, व्यक्तिमत्वातला साधेपणा दुर्लक्षिला जातो. त्यात आकर्षून घेणारे कोणतेच एलेमेंनट्स नसतात. साधेपणा म्हणजे बेंगरुळपणा, आळशीपणा, शॉर्टकट असाही समज होतो. 
कंगोरे, नक्षी, रंगाची उधळण, वैविध्य हे डिझाईनला गुढपणा आणतात, खोली आणतात. 
निदान तसा आभास निर्माण करण्यात यशस्वी होतात. 

निळं, स्वच्छ, एकरंगी आभाळ नजरेला कंटाळा आणतं. पण रोज सकाळ संध्याकाळ रंगांची उधळण करणारं आकाश कितीही वेळा पाहून मन भरत नाही. 

असं असताना साधेपणाची ओढ का वाटावी मनाला? 

मिनीमालिझममधलं सौंदर्य ज्याला उमगलं त्याला सगळं उमगलं. जगणं उमगलं. 
खरंखुरं जगताना सोबत कशाचीही गरज वाटू नये. 
सोबत असावी फ़क्त आपल्या समृद्ध व्यक्तिमत्वाची. ज्यात काहीही अडगळ शिल्लक नाही, कोपरे लख्ख आहेत, त्यात राहणं हे खरं जगणं.

Monday, October 10, 2016

कलेमधे काही जेनेरिक आर्ट फ़ॉर्म्स असतात. उदा. नाग मंडल किंवा ट्री ऑफ़ लाईफ़, किंवा इतरही अनेक. आदिवासी कला या मोटिफ़्सना बेस धरुन विकसित होते.
आजकाल अनेक शहरी कलाकार- पेंटर्स किंवा दागिने बनवणारे, आपल्या कलाकृतींमधे हे मोटिफ़्स वापरतात. जसेच्या तसे. काही मोजके कलाकार या मोटिफ़्सना स्वत:च्या वेगळ्या कल्पकतेने वेगळ्या स्वरुपात खुलवतात.  उदा. के. जि. सुब्रमण्यन, गणेश पाईन. ते मुळच्या आदिवासी मोटिफ़्समधे आपल्या काही वेगळ्या मटेरियल, फ़ॉर्म, कन्सेप्टमुळे वेगळेपणा आणतात.
पण इतर अनेक जण असतात ते आदिवासी मोटिफ़्स जशीच्या तशी कॉपी करतात.
आणि म्हणतात हा तर जेनेरिक फ़ॉर्म आहे.

एक आर्ट हिस्टोरियन या नात्याने यात माझा काय टेक असू शकतो?

मुळात आदिवासींनी निसर्गातून हे मोटिफ़्स उचलले आणि आपल्या कलेत आणले तेव्हा त्यात स्वत:चा डिझाईन सेन्स, बुद्धी, कल्पकता ओतली. त्यातूनच हे मोटीफ़ तयार झाले. हे जेनेरिक मोटीफ़ प्रत्येक जमातीतल्या आदिवासींचे वेगळे, त्यांचा स्वत:चा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटलेले आहेत. त्यात त्यांनी आपली स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण कला ओतली आहे, त्यांच्या स्वत:च्या शैलीत ते मोटीफ़ विकसित झाले आहेत.
उदा. ट्री ऑफ़ लाईफ़ मोटीफ़. प्रत्येक आदिवासी जमातींमधला ट्री ऑफ़ लाईफ़ वेगळा आहे. त्या जमातीच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन्सनी तो स्पष्ट वेगळा ओळखता येतो.
उदा. हा गोंड जीवनवृक्ष, हा सावोरी जीवनवृक्ष, हा वारली जीवनवृक्ष, हा मधुबनी.. इत्यादी.

एका जेनेरिक मोटीफ़पासून या प्रत्येकानी स्फ़ुर्ती घेऊन आपला स्वतंत्र जीवनवृक्ष विकसित केला. 

पण शहरी कलाकार काय करतात? ते हाच मोटीफ़ आपल्या कलाकृतींमधे उदा. पेंटींग, दागिन्यांमधे वापरताना जसाच्या तसा वापरतात. स्वत:ची काहीही वेगळी वैशिष्ट्य त्या डीझाइनमधे घालण्याचे कष्ट घेत नाहीत, स्वत:ची वेगळी कन्सेप्ट विकसित करत नाहीत.
सगळी नैतिकता धाब्यावर बसवून ते हे करतात. आणि म्हणतात सगळेच करतात.

सगळेच तसं करतात, म्हणून मीही.
या विधानांना काय अर्थ असतो नेमका? 

आणि मग तुमच्या ग्राहकांचं काय? ते  तुम्हाला डिझाईनच्या एक्स्क्लुजिविटीचे पैसे देतात, भरमसाठ.
त्यांची फ़सवणूक नाही का या प्रकारात? फ़ार तर स्किलचे पैसे लावा. डिझाईन, फ़ॉर्म किंवा कन्सेप्टचे कसे लावता?
शिवाय मग तुम्हाला आर्टिस्ट का म्हणायचे? 



निसर्गातल्या नैसर्गिक ध्वनींमधून लोकसंगीत बनतं.  लोकसंगिताच्या त्या धूनपासून एखादा कल्पक संगीतकार, काही संस्कार करुन गाणं बनवतो. ते योग्यच असतं. पण मग त्या गाण्यावरुन बाकी संगीतकार आपापल्या भाषेत जशीच्या तशी गाणी बनवतात. ते चूक असतं.
पण कोणी आक्षेप घेतला तर ते म्हणतात हे मुळातलं लोकसंगीत. अरे पण मग त्या संगितकाराने आपला वेगळा ठसा उमटवून धून बनवली तसं तुम्ही करायचे कष्ट का घेतले नाहीत?

जेनेरिक मोटीफ़्सच्या बाबतीत आर्टिस्टने स्वत:ची काहीतरी वेगळी कल्पकता, कन्सेप्ट वापरायलाच हवी.
पिरियड