Tuesday, October 11, 2016

तीन महिन्यांच्या गॅपनंतर आज टाऊनला चक्कर झाली.
कमलनयन बजाज गॅलरी मधे शुभांगी चेतन या आर्टिस्टचे ’पोत’ (टेक्श्चर्स) नावाचे प्रदर्शन भरले आहे. पहिलेच आहे. ब्लॅक इन्क, थोडी ब्राऊन टीन्ट वापरुन झाडांच्या खोडाचा पोत तिने आपल्या सगळ्या पेंटींग्जमधे रंगवला होता. दिसायला चांगली होती, चित्रांना फ़्लो छान होता पण ’पोत’ मधे जे वैविध्य अपेक्षीत आहे ते नव्हते. वैयक्तिकरित्या मला झाडांच्या खोडांचे फ़ॅसिनेशन असले तरी खरखरीत, खडबडीत, मुलायम, रखरखीत, रेशमी, मऊ, दगडी अशा अनेक प्रकारचे "पोत" असू शकतात ते इथे नव्हते. अर्थात हा आर्टिस्टचा चॉईस झाला. पण मला खटकलेली गोष्ट म्हणजे एकाही इमेजला ’स्पर्श’ करुन पहावासा वाटण्याजोगे टेक्स्चर कॅनव्हासला आणण्यात आर्टिस्ट कमी पडली. वेगळे टेक्निक वापरुन हे करता आले असते. पेंटींग्जमधे रंगलेपनातूनही जो पोत दिसतो, ्जाणवतो तो इथे नव्हता. हे फ़्लॅट होतं.
ठाणे स्कूल ऑफ़ आर्टची विद्यार्थिनी
रचना संसदचे सर आपल्या फ़र्स्ट इयरच्या मुलामुलींना घेऊन आले होते, छान वाटलं तो घोळका पाहून. फ़क्त ते प्रत्येक चित्र मुलांना ’समजावून’ सांगत होते. त्या ऐवजी आधी त्यांना चित्र पाहू देऊन तुम्हाला काय ’समजले’ विचारले असते तरी चाललं असतं असं वाटलं.

एनजिएमए मधे अल्काझी फ़ाउंडेशनचं आर्काइव खुलं केलं गेलं आहे आणि ते महान अनमोल आहे. प्रत्येक नाट्यप्रेमीनीच नाही, तर चित्रकला, सिनेमा, राजकारण, प्रवास, संगीत, नृत्य यात रस असणा-या प्रत्येकाने ते पहावं. अल्काझी हा माणूस शब्दश: एक संस्था आहे.
ओम शिवपुरी तरुणपणी ऎक्चुअली हॅन्डसम दिसायचा. सुधा शिवपुरी देखणी दिसायची. रोहिणी ओक (हत्तंगडी) तशीच दिसायची, नासिर, अमरिश पुरीला तरुण पाहिलेलं आठवत असल्याने ते काही फ़ार वेगळे नाही वाटले.

इंडियन कॉस्च्यूम्सची पुस्तकं, अल्काझींच्या नाटकांच्या सेट्सच्या मिनिएचए प्रतिकृती, त्यांचे कॉस्च्यूम्स, मराठी नाटकांच्या ऐतिहासिक संदर्भांचं पुस्तक, अल्काझींच्या थिएटर वर्कशॉप्सचे व्हिडिओज आणि शेकडो, हजारो कृष्णधवल देखणी छायाचित्रे.

अल्काझी टाइम्स हा तर अफ़लातून प्रकार, आर्ट आणि थिएटर टाईम्स हे एक काल्पनिक वर्तमानपत्र अल्काझी चालवत होते. गेल्या शतकापासूनच्या नाट्य, चित्रकला क्षेत्रापासून राजकारणापर्यंत असंख्य बातम्यांचं कोलाज भिंतींवर लावलेलं आहे. त्यात धुरंधरांचं निधन पासून पाकिस्तानचा हल्ला, केनेडीची हत्या पासून गांधीचं उपोषण.. अनेक बातम्या खरोखरीच्या वाचायला मिळतात.
सुलतान अकबर म्हणजे अकबर पदमसींचे कोण?
अल्काझी किती छान चित्रकारही होते. अनमोल डॉक्यूमेन्टेशन आहे हे प्रदर्शन.

हे प्रदर्शन पुन्हा पाहून त्यावर सविस्तर लिहायला हवं आहे.

बाकी तीन महिन्यांनंतर गेले आज टाऊनला. तो एक अनुभवच वाटला वेगळा. मरिन ड्राइव, त्यावरचा मावळता सूर्य, नरिमन पॉइन्ट, वरळी, हाजी अलीची स्कायलाईन पाहून नजरेवर गेले कित्येक दिवस ठळकपणे उमटलेली आल्बनी, न्यूयॉर्कच्या देखण्या नजा-यांची इम्प्रेशन्स फ़िकट झाली. आपली मुंबईही किती देखणी आहे.. असं झालं.


No comments:

Post a Comment