Saturday, December 3, 2016

म्युझियम डेज..

एक संदर्भ शोधण्याकरता मी नोटबुक्स, डाय-यांची उलथापालथ करत होते त्यावेळी मला २०१२ मधलं आर्ट जर्नल मिळालं. २०१२ च्या जुलैमधे मी डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियममधे त्याच वर्षी सुरु झालेल्या "मॉडर्न ऎन्ड कंटेम्पररी इंडियन आर्ट हिस्टरी" या पोस्ट ग्रॅड कोर्सकरता प्रवेश घेतला होता. कोर्स शुक्रवार-शनिवार-रविवार असे तीन दिवस असायचा.  शुक्रवार-शनिवार लेक्चर्स, त्यात शुक्रवारी इन-हाऊस फ़ॅकल्टी आणि शनिवारी एक्स्टर्नल फ़ॅकल्टी, आणि रविवारी आर्ट गॅलरी व्हिजिट्स, शोज- एक्झिबिशन्स वगैरे. 
हा कोर्स करत असताना मी एका आर्ट मॅगझिनचं काम करत होते, शिवाय एका दैनिकाकरता आर्ट कॉलम लिहायचे. बाकी इतर लेखन, फ़्रीलान्स असाइन्मेन्ट्स वगैरे असायच्याच. त्यामुळे सुरुवातीला प्रवेश घेतल्यावर सहज होऊन जाईल असं वाटलेला हा कोर्स वेळेच्या दृष्टीने फ़ारच हेक्टीक ठरला. घरी मुलींचं शाळा-कॉलेज, नव-याचे परदेश दौरे हे सगळंही त्यातच. अक्षरश: जीवतोड धावपळ झाली ती दीड वर्षं. पण कोर्स अत्यंत  इंटरेस्टींग होता यात वादच नाही. एकही लेक्चर बुडवू नये असं वाटायचं. तस्निम मेहतानी कोर्स डिझाईन करताना खूप विचार केला होता. मुंबईत अशा त-हेचा हा पहिलाच कोर्स होत होता त्यामुळे त्या दृष्टीनेही महत्व होतं. प्रोफ़ेशनल पद्धतीने, ब्रिटिश म्युझियममधे असलेल्या अशाच त-हेच्या कोर्सच्या अभ्यासक्रमावर बेतलेला होता. कोर्सची फ़ी ५० हजार, म्हणजे तशी तगडीच होती. बडोदा, जेएनयू, शांतीनिकेतन, बंगलोर, लंडन, अमेरिका सगळीकडून फ़ॅकल्टीज बोलावलेल्या होत्या. 
म्युझियममधला प्रत्येक क्षण संस्मरणीय ठरला. या आधी कधीही इतक्या जवळून म्युझियम अनुभवलं नव्हतं. 
तर आता अचानक हातात आलेलं आर्ट जर्नल चाळत असताना त्या कोर्समधलं प्रत्येक लेक्चर आठवायला लागलं. 
कोर्स पूर्ण झाल्यावर त्याचा नेमका काय फ़ायदा झाला वगैरे सांगता यायचं नाही, कारण एकतर मला नव्याने कोणतीही करिअर सुरु करायची नव्हती. माझी कलाविषयक जाण एकंदरीत वाढावी इतकाच उद्देश हा कोर्स करण्यामागे होता. माझी ’चित्रभाषा’ सुधारायला याचा फ़ायदा निश्चित झाला असं आता म्हणता येतय.
तर आता जमेल तसे आर्ट जर्नलमधे नोंदवलेले म्युझियम डेज या ब्लॉगवर क्रॉनिकल करावे असा विचार करते आहे. जरा मजा..