Tuesday, April 26, 2016

लहान वयात दोनदा एव्हरेस्ट आणि गौरिशंकर चढून गेलेल्या संतोष यादव यांची एक अनौपचारिक मुलाखत वाचत होते. मुलांच्या जन्मानंतर त्यांनी माउंटेनिअरिंगमधून ब्रेक घेतला. आता त्या हिमालयात एका गावात लहान मुलांकरता शाळा भरवतात. अगदी साध्या सुध्या आहेत संतोषजी. कोपरापर्यंत ब्लाऊज, सुती साडी, तिचा डोक्यावरुन हरयाणवी पद्धतीने घेतलेला पदर, कपाळावर पिंजरेचं कुंकू वगैरे असं मुलाखतीत लिहिलेलं.
तर त्या सांगत होत्या की मुलांना पर्यावरणाचं रक्षण करायला शिकवायचं असेल तर आधी निसर्गाशी, हिमालयाशी नातं जोडणं शिकवायला हवं. आणि त्याकरता त्यांना स्वत:शी, समाजाशी, नात्यांच्या परिघाशी पक्क बांधणं गरजेचं आहे. आता हे कसं करायचं याचा बराच विचार, प्रयोग केल्यावर  लक्षात आलं की त्याकरता त्यांना आपल्या संस्कृतिशी, धर्माशी जोडून ठेवायला हवं. त्यांच्या मनाला, शरिराला शिस्त शिकवायला हवी. आजच्या काळात, जिथे मोहाची, लक्ष विचलीत होण्याची साधनं मुलांच्या सतत अवती भवती असतात तिथे हे साधता येणं अत्यंत मुश्किल. पण जर धर्मातल्या, संस्कृतीतल्या काही रिच्युअल्स, उदा. पूजापाठ, ध्यानधारणा वगैरे.. त्यांच्या अंगात भिनवल्या गेल्या, तर आपोआप त्यांच्या दिनक्रमाला शिस्त लागते. मनाला शिस्त लागते. ध्यानधारणेमुळे ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण वाढते आणि मग स्टॅमिना, उर्जा वाढते असे बरेच फ़ायदेही होतात. साधारण पारंपरिक हिंदू घरांमधे या रिच्युअल्स रेग्युलर पाळल्या जातात, पण शहरी मुलांना ते शिकवणार घरात कोणी नसतं. म्हणून मग कधीही उठा, कधीही, कसंही जेवा, कधीही झोपा असे प्रकार लहान वयापासून सुरु होतात आणि मग बेशिस्त अंगात भिनते, जी आपल्या आयुष्यातही उतरते.
आता यातलं योग्य-अयोग्य इत्यादीबद्दल वेगळी मतं असू शकतातच.

बाकी धार्मिकता वगैरे जाऊदे. पण मला रिच्युअल्सचं इन जनरल महत्व मात्र हल्ली मनापासुन पटायला लागलय. कर्मकांड शब्दातला धार्मिक संदर्भ बाजूला ठेवला तरी रोजच्या जगण्यात इतरही असतातच ती.
अशा रिच्युअल्स करण्यामुळे आयुष्य सोपं आणि आपल्या ताब्यातलं होतं. ठराविक गोष्टी ठराविक वेळेत उरकल्या एकदा की मग बाकी गोष्टी करायला दिवस मोकळा. गरजेच्या गोष्टीच झाल्या नाहीत असा ताण मग मनावर रहात नाही.
पूर्वी मी ट्रेक, पिकनिकवर गेल्यावरही सकाळी मेडिटेशन वगैरे करणं न चुकवणा-यांचा वैताग करायचे. पण आता आपापल्या दिनक्रमानुसार, गरजेनुसार काही रिच्युअल्स आपल्यात भिनवणं आत्यंतिक गरजेचं आहे हे मला कळलय. मग ते हेल्थ रुटीन असो, ब्यूटी रेजिम असो की वर्क शेड्यूल. रात्री झोपायच्या आधी उद्याच्या कामांची यादी करणे, सकाळी उठल्यावर योगासनं, ब्रिदिंग एक्सरसाईज करणे, वॉक घेणे, ठराविक वेळीच आंघोळ करणे, जेवणे पासून अगदी आठवड्यातून अमुक दिवशी केसांना तेल लावणे, पेडिक्युअर करणे अशी कामे रिच्युअल म्हणून अंगात भिनवून घेतली की निदान अशा कामांनाही (माझ्यासारखी) रिमाइंन्डर्स लावायची गरज रहात नाही.
मात्र रुटीनचं रिच्युअल होण्याकरता कठोर शिस्तीला पर्याय नाहीच. इथे ती मुळातच अंगात नसल्याने हे सगळं अधुन मधुन बारगळतं. अजून पूर्वीपासून सुरुवात करायला हवी होती, जरा आई-वडिलांचं, आजी-आजोबांचं या बाबतीत तरी ऐकायला हवं होतं असं वाटत रहातं.
आणि आता यात अजून एक विदारक गंमत अशी की स्वत:त रिच्युअल्स भिनवायचं महत्व कळायलाच इतकं आयुष्य उलटलं, मुलींचं काय? त्यांना कसं हे रिच्युअल्सचं महत्व समजवायचं? ते शक्य नाहीच व्हायचं आमच्याने. आम्हीच मुळात रात्री दीड दोननंतर झोपणार, मग सकाळची कामं दुपारी करणार.. शेड्यूलच्या धज्जियां स्वहस्ते रोज उडवणार.. मुलींना स्वत:हून लवकर अक्कल येवो.
तर आता संतोष यादवजींच्या शाळेमधे या वयातही भरती होता येतय का याची चौकशी करावी असा विचार मनात येतोय.


एकेक आठवडा असा येतो की तो मध्यावर आलेला असताना लक्षात येतं सगळ्या ठरवलेल्या शेड्यूलच्या धज्जियां उडताहेत. एकही काम ठरवल्यानुसार होत नाहीये. रोजची कामंही मागे पडताहेत. अगदी रविवारचे पेपरही गुरुवारपर्यंत वाचून झालेले नसतात. ठरवलेल्यापैकी एकही कामाचा फोन झाला नाही, लिहून झालेलं नाही आणि आता ते अगदी गळ्याशी आलय. यामागे आपलीच चालढकल, भलत्याच गोष्टींमधे रमून जाणं, फ़ेसबुकवर रेंगाळणं, मित्रमैत्रीणीसोबतचा फ़ुकट टाईमपास, फोनवरची लांबलेली गॉसिप्स हे सगळं असल्याचं पक्कच ठाऊक असल्याने दोष कुणावर ढकलताही येत नसतो. 
सगळ्यात दारुण म्हणजे हे असे आठवडेच जास्त असतात याची जाणीव डायरीची मागची पानं उलटल्यावर लक्षात येणं. साधारण बुधवार-गुरवारच्या सगळ्याच एन्ट्र्या या अशा स्वत:ला कोसणा-या. 
कितीही टाईम मॅनेजमेन्टच्या टीप्स वाचा, डिक्लटरिंग, मिनिमलिझमचे कॉलम्स लिहा.. मनाला लगाम घालण्याची बाळबोध पुरातन शिकवण अंगी रुजत नाही तोवर सगळं व्यर्थ आहे. 

Monday, April 25, 2016

पॅटर्नच्या अलीकडे पलीकडे..

पॅटर्नच्या फ़ार अलीकडे पलीकडे तुम्हाला हलता येत नाही. म्हणजे तुमचं जगणं, वाचणं, बोलणं, व्यक्त होणं, लिहिणं अगदी वेगळं वागणंही पॅटर्नच्या आसपासच. पॅटर्न रक्तात गोंदवलेला असतो. डिएनएच्या पत्र्यावर ठोकलेला असतो.
आपल्या जन्माच्याही अगोदरपासून कित्येक जन्मलेल्यांनी त्यांच्या जगण्यातून ठरवलेला पॅटर्न.
पॅटर्नच्या जरा इकडे किंवा जरा तिकडे बरेच जण जातात. काही मोजके फ़ारच इकडे किंवा फ़ारच तिकडे सरकत जातात. दुस-या पॅटर्नच्या जगण्याकडे आकर्षित होऊन, त्यांच्या जवळ, कधी कधी थेट त्यांच्या परिघातच घुसून.
त्यातले काही नंतर व्यक्त होतात लिहिण्यातून, बोलण्यातून तेव्हा आपल्यापर्यंत त्यांचं असं खूप इकडे तिकडे सरकून वागलेलं, जगलेलं पोचतं.
अर्थात व्यक्त होताना, व्यक्त होण्याकरता त्यांना पुन्हा आपल्या आधीच्या पॅटर्नच्याच आसपास येऊन पोचावं लागतच, तरंच आपलं पॅटर्नपासून फ़टकलेलं जगणं पॅटर्नच्या परिघात जगणा-यांपर्यंत पोचवण्यात यश मिळतं. त्यांना याची का गरज वाटावी? म्हणजे त्यांना खास याकरता पुन्हा पॅटर्नच्या इतक्या जवळ यावसं वाटावं हे जरासं केविलवाणच. आधीचा सगळा प्रयास कशाकरता होता मग?
पण निदान त्यामुळे आपल्याला वेगळं जगलेलं, वागलेलं पहायला मिळतं.
काही मुळातच आपल्यापेक्षा वेगळ्या पॅटर्नमधे जगणारी असतात. ते त्यांच्या पॅटर्नच्या फ़ार अलीकडे पलीकडे न हलता जगतात. त्यांच्यापैकी काहीजण खूपच अलीकडे पलीकडे जाऊन आपल्या पॅटर्नच्या अगदी जवळ, अगदी आपल्या परिघातच येऊन जगायला लागतात. आपल्याला सुरुवातीला ते वेगळं वाटतं पण त्यांच्या परिघातून आपल्या परिघापर्यंत येईस्तोवर त्यांच्या वेगळ्या पॅटर्नचे कानेकंगोरे घासुन, ठोकून आपल्या पॅटर्नमधे फ़िट बसण्याजोगेच झालेले असतात. अगदी त्यांच्या अंगावरचे वेगळे ठिपके, डिझाईनही फ़िकट होऊन पुसलेले आणि इव्होल्यूशनच्या थियरीनुसार या बदललेल्या पॅटर्नच्या नव्या डिझाईनचा अंगरखा त्यांच्या अंगावर चढायला सुरुवातही.

पॅटर्नमधल्यांची अशी ये-जा सारखी चालूच असते. एका पॅटर्नवाल्यांना दुस-या पॅटर्नवाल्यांच्याअ ख-या जगण्या वागण्याची फ़ारशी जेन्युईन कल्पना येऊच नये या हेतूने सगळी रचना कशी पॅटर्नप्रूफ़.  

Sunday, April 24, 2016

मुंबई मोमेन्ट-एक

भर दुपारचं मुंबईतलं रणरणतं उन्ह. आजचा शनिवार बरेच दिवस राहून गेलेली टाऊनमधली काही महत्वाची आर्ट एक्झिबिशन्स बघण्याचा. चालतच जायचं हा अट्टहास भारी पडतोय का असं या कोसळत्या उन्हामधे पावलं उचलताना क्षणोक्षणी वाटतय. पण मजाही येतेय. 

एनजिएमएमधे सौंदर्यवादी, फ़िगरेटीव परंपरेतले आलमेलकर बघून झाल्यावर वरच्या डोममधे भरलेलं प्रभाकर पाचपुतेचं विदर्भातल्या कोळशांच्या खाणींमुळे बदललेल्या भौगोलिक, सामाजिक परिस्थितीवरचं भाष्य असलेलं इन्स्टॉलेशन बघणं हा किती टोकाचा, वेगळा अनुभव. एक नॉस्टेल्जियाची सुनहरी सैर आणि दुसरी जळजळीत वर्तमान. आलमेलकरांची स्ट्रॉबोर्डवरची लयबद्ध आदिवासी जीवन चित्रित करणारी आल्हाददायक स्केचेस, कॅनव्हासवरची वॉटरकलर्स, टेम्पेरा..  त्यात त्यांच्या जगण्यातलं वास्तव फ़ारसं आलेलं नाही, आलं असलंच तर आकर्षक, निर्भर, काव्यमय जगण्याच्या टिपिकल साच्यातलंच. पाचपुतेने डोमच्या भिंतींवर कोळशाने चितारलेली स्वैर स्केचेस, मातीच्या जमिनीवरचे तडे, खाणींमुळे पडलेली विवरं, टोळधाडी, खाणकामगारांचं अधांतरी, असुरक्षित जगणं.. चित्रकला निदान इतका प्रवास करुन वास्तवापर्यंत पोचते आहे हे दिलासादायक वाटलं.
क्लार्क हाऊसमधलं सचिन बोंडेचं प्रदर्शन, तेलसाम्राज्याचा राजकीय, सांस्कृतिक आढावा हेही याच प्रकारातलं. 
केमोल्डमधे डेसमन्ड लाझारेस. मायग्रेशनची त्याची वैयक्तिक कहाणी..

आर्टीस्ट्सचं काम पाहून झाल्यावर नेहमी मनात येणारा सनातन प्रश्न. पोचलाय का हा माणूस पूर्णपणे आपल्यापर्यंत त्याच्या कलेसोबत? कशाला पोचायला हव खरं तर? कथेतून, कादंबरीतून लेखकातला माणूस कुठे पोचतो प्रत्येकवेळी? मग चित्रकाराच्या मनातल्या उर्मी, स्पंदनं कॅनव्हासवरुन पोचायला हवीत हा मनाचा आग्रह का आहे माझ्या? आर्ट एक्झिबिशन पाहून झाल्यावर आर्टिस्टशी बोलल्याशिवाय, त्याच्याबद्दल वाचल्याशिवाय माझा प्रवास पूर्ण होत नाही. त्याचा प्रवास आणि माझ प्रवास हा एका कोणत्या तरी बिंदूला एकमेकांना छेदायला हवा. त्या क्षणीक नजरानजरीतून जे समजतं ते अलौकिक असतं हे मात्र खरं.

वेवर्ड अ‍ॅन्ड वाईजमधून जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने जेफ़ डायरचं द सर्च घेतलय. त्याचं जेफ़ इन व्हेनिस आवडलेलं. बघू हे कसं आहे. या दुकानात आख्खा दिवस घालवायचा आहे एकदा. किंवा अनेकदा.


पुन्हा ब्लॉगिंगकडे..

आज संवेदने आठवण करुन दिली तेव्हा लक्षात आलं की कितीएक दिवसांमधे निरुद्देश, मनमोकळं, फ़क्त स्वत:करता असं लिहिलंच नाहीये. दिसामाजी लिहिणं होतंच असतं व्यवसायच लेखकाचा म्हटल्यावर. तरीही आत्यंतिक प्रेमातून लिहिणं फ़ारच वेगळं. लेखनातला मनमोकळा श्वास म्हणून तरी आता लिहायला पाहिजे असं.. रोजच्या जगण्यातलं, विस्कळीत, काहीही, बिनामहत्वाचं आणि स्वत:ला आवडलेलं.
कोणी वाचो, न वाचो..
आता याकरता नियमित वेळ काढणं आलं. जो मोकळा वेळ सध्या मिळतोय तो सगळ फ़ेसबुकवर फ़ालतू काहीतरी वाचण्यात जातोय.
खरय
फ़ेसबुकवरच्या फ़ुटकळ पोश्टींमुळे हे सगळं होतय.
च्यामारी त्या फ़ेसबुकच्या. सगळ्याची वाट लावलीय.. वेळेची, वाचनाची आणि लिहिण्याची.